Loksabha2019 : महाराष्ट्रात काँग्रेसला ‘एवढ्या’ जागा जिंकण्याचा आत्मविश्वास

भाजप २४०, काँग्रेस १४० जागांचा अंदाज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या पाच टप्प्यांमध्ये २६ राज्यातील ४२५ जागांसाठी आतापर्यंत मतदान झाले आहे. यामध्ये आपल्याला किती जागा मिळतील, याचे आडाखे बांधणे भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या मुख्यालयात सुरु झाले आहे. त्यात भाजपला २४० पेक्षा अधिक तर काँग्रेसला १४० पेक्षा अधिक जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात ११ जागा मिळतील असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. त्यात काँग्रेसच्या प्रयत्नांपेक्षा राज ठाकरे यांच्या सभांना मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाचा जादा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यात १०० जागांची भर पडेल, असा पक्षाचा अंदाज आहे. त्याप्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ११ ते १३ जागा मिळतील. राजस्थानमध्ये १५, मध्य प्रदेशात १४, छत्तीसगडमध्ये ८, पंजाबमध्ये ८ ते ९, आसाममध्ये ६ ते ७, गुजरातमध्ये ६ जागा मिळेल, असा काँग्रेसचा सर्व्हे सांगत आहे.

दुसरीकडे भाजपच्या वॉररुममध्ये काम करणारे ५५ जण विविध मतदार संघातील मतदानाचे प्रमाण व इतर बाबींचे विश्लेषण करीत आहेत. एनडीएतील घटक पक्ष लढवत असलेल्या जागांवर झालेले मतदान व तेथील स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी भाजपच्या वॉररुममध्ये स्वतंत्र विभाग आहे. तेथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो स्वयंसेवकांकडून ही माहिती मागविली जात आहे.

२०१४ मध्ये भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. यंदा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा भाजप करीत असला तरी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये १०० जागांवर फटका बसेल, अशी चर्चा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे. ही उणीव पश्चिम बंगाल, कर्नाटक, हरियाना या राज्यातून भरुन काढण्याचा प्रयत्न आहे.

भाजपकडून ३०० जागा स्वबळावर जिंकण्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विरोधी पक्षही संशय व्यक्त करीत आहे. दुसरीकडे निवडणुका जशा पुढे जात आहे. तशी विरोधकांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.