शिवसेना उमेदवारांविरोधातील बंडखोरांवर भाजपाची अद्याप नाही कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या १४ बंडखोरांची भाजपाने आतापर्यंत हकालपट्टी केली आहे. मात्र, शिवसेना उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपा नेत्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. महायुतीची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना माघारी घेण्याचे आवाहन केले होते.

जर त्यांनी तसे जाहीर केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. शिवसेना भाजपाविरोधात ५० ते ६० ठिकाणी बंडखोर उभे आहेत. त्यापैकी भाजपाने आतापर्यंत १४ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असे आदेश काढले आहेत.

त्यात प्रामुख्याने विनोद अग्रवाल (गोंदिया), सीमा सावळे (चिंचवड), सतीश होले (दक्षिण नागपूर), अशोक केदार (मेळघाट) गुलाब मडावी (गडचिरोली), राजू तोडसाम (आर्णी, यवतमाळ), चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी), दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर), भाऊराव उके, रतन वासनिक, छत्रपाळ तुरकर, अमित बुद्धे अशी हकालपट्टी केलेल्यांची नावे आहेत.

मात्र, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात उभे असलेले राजन तेली, कागलमध्ये संजय घाटगे यांच्याविरोधात बंडखोरी केलेले समरजित घाटगे, राधानगरीतील राहुल देसाई, शिरोळमधील अनिल यादव, कोल्हापूर उत्तरमधून चंद्रकांत जाधव अशा अनेक शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपाने अद्याप कारवाई केली नाही.

तसेच शिवसेनेनेही भाजपा उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर अद्याप कारवाई केली नाही. त्यामुळे भाजपाने ही कारवाई रोखून ठेवली असल्याचे सांगितले जात आहे.

Visit : Policenama.com