राज ठाकरेंच्या ‘लाव रे व्हिडीओ’ ला भाजपचे ‘ठाकरी’ भाषेत प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून मोदी सरकार विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. या सभांमध्ये मोदी सरकार विरोधात व्हिडिओ दाखवले जातात. व्हिडिओ दाखवण्या आगोदर ‘लाव रे व्हिडीओ’ हे राज ठाकरे यांचे वाक्य गाजत आहे.

आता भाजपानेही मनसेवर ट्विटरवरून पलटवार केला आहे. भाजपने मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसंदर्भात प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे व्हिडीओ ट्विट केले आहे. “काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का”, असे म्हणत भाजपाने मनसेला थेट इशारा दिला आहे. राज ठाकरे राज्यात घेत असलेल्या सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय ठरत आहे. या सभांमध्ये पुराव्यासह केलेले भाषण लोकांना आकर्षित करत आहे. सभेत व्हिडिओ दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणताना दिसतात. यावरून भाजपानेही आता मनसेवर पलटवार केला आहे.

भाजपने काल (गुरूवारी) रात्री पहिला व्हिडिओ ट्विट केला आहे. डोंबिवीलीत मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या आरोपाची बातमी भाजपने ट्विट केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप फेरीवाला संघटनांनी काही महिन्यापूर्वी केला होता. हाच व्हिडिओ ट्विट करून भाजपने म्हटले आहे ‘काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का….!’

‘मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते’ #लावरेव्हिडीओ
भाजपने आज (शुक्रवार) दुपारी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात मनसे पदाधिकारी साडी चोरतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. ‘मनसे कार्यकर्ते साडे चोरताना’ #लावरेव्हिडीओ असे या ट्विट केले आहे.