सट्टा बाजारात भाजप ‘फेव्हरेट’ ; सट्टा बाजाराचा काय आहे अंदाज, जाणून घ्या कोणाला किती जागा ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – स्पर्धा आली की सट्टा लावणारे खुष असतात. खास करून क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजारात कोट्यवधींचे व्यवहार होतात. परंतु सट्टा लावणाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतरही सध्या सट्टा बाजार तेजीत असून कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत. या सट्टा बाजारात मात्र सर्व पक्षांमध्ये सध्या भाजप फेव्हरेट असल्याचे दिसत आहे. तर रालोआ (एनडीए) ला ३०० जागा त्यापैकी २४६ जागा भाजपला मिळतील असा अंदाज सट्टा बाजारात बांधला जात आहे. तर मोदीच पंतप्रधान असतील असा ठाम विश्वास सट्टा बाजाराला आहे.

एरवी क्रिकेट सामन्यांवर तेजीत असलेला सट्टा बाजार लोकसभा निवडणूकीतही तेजीत आहे. सट्टा बाजारात विविध पक्षांसह उमेदवारांवर कोट्यवधींचा पैसा लावला गेला आहे. निवडणूक सुरु झाल्यापासून सट्टा बाजारात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप पक्षांवर सट्टा लावला जात आहे. परंतु या सर्व पक्षांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. सट्टा लावणाऱ्यांमध्ये भाजपच फेव्हरेट असल्याचे पहायला मिळत आहे. एनडीए, महाआघाडीला किती जागा मिळतील याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यावर सट्टा लावला जात आहे. निवडणूकीच्या टप्प्यागणीक हे अंदाज बदलत आहे.

  • असा आहे देशाचा अंदाज
    आधी एनडीए म्हणजेच रालोआला ३४७ जागा मिळतील आणि भाजपला ३०० जागा मिळतील असा अंदाज होता. परंतु तिसऱ्या टप्प्यानंतर सट्टा बाजारात या जागा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय भाजपला मिळणाऱ्या जागा आता कमी झाल्या आहेत. त्यात रालोआला ३०० पैक्षा जास्त जागा मिळतील तर भाजपला त्यातील २४६ जागा मिळतील असा अंदाज बांधला जात आहे. तर राज्यात महायुतीला ३ जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसला यंदा ८० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. गेल्या निवडणूकीत कॉंग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. तर महाआघाडीलाच एकूण १२० जागा मिळणार असल्याचा अंदाज सट्टा बाजारात आहे.
  • असा आहे राज्याचा अंदाज
    राज्यात भाजप शिवसेना महायुतीलाच सट्टा लावणाऱ्यांची पसंती आहे. त्यांना राज्यात ३३ जागा मिळतील. यात भाजप १९ तर शिवसेना १४ जागांवर बाजी मारेल असला अंदाज आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला १४ जागा मिळतील आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यापैकी राष्ट्रवादी क़ॉंग्रेसला ७, कॉंग्रेस ५, स्वाभीमानी शेतकरी संघटना १ जागा असा अंदाज आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याने सुप्रिया सुळे यांचा भाव वधारला आहे. तर गिरीश बापट पुण्यातून निवडून येणार या शक्यतेने भाव लावला जात आहे. तर उत्तरप्रदेशात जरी बसपा आणि सपा युती झाली असली तरी भाजपला ५० जागा मिळतील असा अंदाज सट्टा बाजाराला आहे.