भाजपच्या संपत्तीत २२ टक्क्यांनी ‘वाढ’, काँग्रेसची संपत्ती ‘घटली’ : ‘ADR’चा अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले तर काँग्रेस पुन्हा तळाला पोहचली. भाजपच्या हाती पुन्हा सत्तेची सूत्रे आली. या सत्तेचे आर्थिक परिणाम देखील दिसून येत आहेत. एका अहवालानुसार, सत्ताधारी भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे, तर कॉंग्रेसची संपत्ती खालावली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. ज्यात २०१६-१७ ते २०१७-१८ या काळात सात राष्ट्रीय पक्षांनी (भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, भाकप, सीपीएम आणि एआयटीसी) जाहीर केलेल्या मालमत्ता, दायित्वांचे तपशील दिले आहेत. एडीआर म्हणजे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म दरवर्षी राष्ट्रीय पक्षांच्या मालमत्तेचा अहवाल जाहीर करते. अनेक राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक आयोगाला त्यांची बॅलन्सशीट दिली. मात्र त्यात आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे या संस्थेने नमूद केले आहे.

भाजप सर्वात श्रीमंत पक्ष ; २२ टक्यांनी संपत्तीत वाढ

२०१६-२०१७ मध्ये राष्ट्रीय पक्षांची सरासरी संपत्ती ४६५.८३ कोटी होती. २०१७-१८मध्ये ही संपत्ती वाढून ४९३.८१ कोटी झाली. २०१६-१७मध्ये भाजपची संपत्ती १२१३.३ कोटी होती. २०१७-१८मध्ये त्यात वाढ होऊन भाजपची संपत्ती १४८३.३५ कोटी इतकी झाली. भाजपच्या संपत्तीत एकूण २२.२७ टक्क्यांनी वाढ झाली. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या काळात केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ दरम्यान काँग्रेसची संपत्ती १५.२६ टक्क्याने घटली. म्हणजे काँग्रेसची संपत्ती ८५४.७५ कोटीवरून ७२४.३५ कोटीवर आली. तर राष्ट्रवादीची संपत्ती ११.४१ कोटीवरून ९.५४ कोटीवर आली. याच काळात तृणमूल काँग्रेसच्या संपत्तीत वाढ झाली असून तृणमूलची संपत्ती २६.२५ कोटीवरून २९.१० कोटी झाली आहे. तृणमूलच्या संपत्तीत १०.८६ टक्क्याने वाढ झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त