भाजपकडून ‘घटनात्मक’ पेच निर्माण करण्याचे प्रयत्न, शिवसेनेच्या संजय राऊतांचा ‘खळबळ’जनक दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तेचा तिढा वाढतच चालला आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे संकेत दिले होते. त्यानंतर शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सध्या भाजप जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. युती तुटावी असे उद्धव ठाकरेंना आजिबात वाटत नाही मात्र राष्ट्रपती राजवट लादण्याचे पाप भाजप सध्या करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सामनाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपकडे बहुमत नसेल तर त्यांनी सरळ सांगावे की, आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही त्यानंतर शिवसेना आपले पाऊल उचलेल असे देखील राऊत यावेळी म्हणाले. तसेच आता धमक्या आणि ब्लँकमेलिंग चालणार नाही. तसेच सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

मतदार शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आणि शब्द न पाळणाऱ्यांना नक्कीच धडा शिकवेल, भाजपला स्वतःला सरकार बनवायचं नाही आणि दुसऱ्यांना देखील बनवू द्यायचे नाही त्यासाठीच भाजपकडून घटनात्मक पेच निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा घणाघात देखील राऊत यांनी यावेळी केला.

Visit : Policenama.com