वंचित आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याच्या रागातून भाजपची ‘या’ तीन तालुकाध्यक्षांना नोटीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षाविरोधी केलेल्या कारवाईचा खुलास करा असे म्हणत भाजपाच्या दोन तालुका अध्यक्ष आणि एका भाजपा युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षाला सांगलीत भाजपाने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, सांगलीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीसही हे तीन तालुकाध्यक्ष गैरहजर होते.

सदर तीनही तालुका अध्यक्षांवर पक्षाविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका ठेवत भाजपाचे सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी पक्षाविरोधी केलेल्या कारवाईचा तातडीने खुलासा करा असे म्हणत नोटीस बजावली आहे. इतकेच नाही तर, जर या तालुका अध्यक्षांनी या बाबीचा खुलासा केला नाही तर, पक्षाविरोधी वर्तन केल्या प्रकरणी कारवाई केली जाईल असा इशाराही चौगुले यांनी दिला आहे. आटपाडीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, खानापूर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्राम माने आणि खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील अशी नोटीस बजावण्यात आलेल्या तालुकाध्यक्षांची नावे आहेत.

काल गोपीचंद पडळकर यांची सांगलीत सभा झाली. या सभेला सदर तीनही तालुकाध्यक्ष या सभेसाठी उपस्थि होते. शिवाय हे तीनही तालुकाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा राग मनात धरत भाजपाने या तिघांना नोटीस पाठवली आहे अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

दरम्यान गोपीचंद पडळकर यांना संजयकाका पाटील यांचा पराभव करायचा असून ते संजयकाका पाटलांचे कट्टर विरोधक आहेत. संजयकाका पाटील यांना पाडण्यासाठीच आपण ही निवडणूक लढतव आहोत असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. आता हे तीन तालुका अधक्ष नोटीसीला उत्तर देणार की, राजीनामा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते नेमकी काय भूमिका घेतील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.