राज्यसभा खासदारांना भाजपाने बजावला व्हीप; सोमवारी उपस्थित राहण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायद्याच्या विरोधात एकीकडे शेतक-यांनी दिल्लीला वेढा घातलेला आहे. तर दुसरीकडे लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा न करताच विधेयक पास केल्याचा आरोप करत विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरु आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 8) भाजपाने सर्व खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी राज्यसभेत शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.

राज्यसभेमध्ये शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा संपली. मात्र लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तर काळात आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कामकाज वारंवार तहकूब होत होते. सायंकाळी 4 आणि पुन्हा 6 वाजता कामकाज सुरु झाले. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

लोकसभेत होणारा विरोध पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी कोणत्याही परिस्थितीत खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.