भाजप खासदारांना ‘व्हिप’ अन् इकडं समान नागरी कायदा ‘ट्रेंड’ मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आप मोठ्या विजयाच्या दिशेने कूच करत असताना भाजपने आपल्या खासदारांना व्हिप बजावला आहे. सोमवारी संध्याकाळी राज्यसभा खासदारांना बजावलेल्या व्हिपनंतर सोशल मीडियावर कॉमन सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा ट्रेंड सुरु झाला. त्यामुळे आता भाजपची पुढील रणनीति काय यावर चर्चा सुरु झाली आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्या टप्प्यातील आजचा अखेरचा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चेला उत्तर देतील. भाजपकडून दोन्ही सभागृहातील खासदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे. उपस्थित राहून सर्वांनी सरकारचं समर्थन करण्याचे आदेश या व्हिपमधून देण्यात आला आहे.

सरकार संसदेत करासंबंधित आर्थिक विधेयक सादर करणार आहे यासाठीचा व्हिप बजावला असू शकतो असे बोलले जात आहे. भाजपचा व्हिप समोर येताच चर्चा सुरु झाली. भाजपने जेव्हा जेव्हा खासदारांना व्हिप जारी केला तेव्हा तेव्हा काहीतरी मोठं मोठे निर्णय घेतले गेले. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, राम मंदिराची घोषणा, नागरिकत्व सुधारणा कायदा याबाबत देखील असेच काहीसे झाले होते.

सोशल मीडियावर समान नागरी संहितेविषयी चर्चा सुरु झाली आहे. कारण, भाजपने लोकसभा निवडणूकीच्या आपल्या जाहिरनाम्यात याबाबत आश्वासन दिले आहे. यातच सोशल मीडियावर एक कागद व्हायरल होत असून तो कागद संसदीय कामकाजाचा भाग असल्याचा दावा केला जात आहे.