तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात तब्बल 300 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याच दरम्यान भाजपाने तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान या विशेष तिरंगा रॅलीची घोषणा केली आहे. शनिवारी (दि. 30) संध्याकाळी 5 वाजता ही रॅली आयोजित केली आहे.

भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीमध्ये विशेष तिरंगा रॅली काढण्यासंदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे. तिरंग्याचा अपमान आता सहन केला जाणार नाही. पोलिसांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आमचा तिरंगा आमचा सन्मान, आमचे पोलीस आमचा अभिमान असे म्हणत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून ही रॅली सुरु होणार आहे. तुम्ही सुद्धा तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन मिश्रा यांनी ट्विटद्वारे केले आहे.

… तोपर्यंत आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरु ठेवणार, शेतक-यांचा मोठा निर्णय
ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय घेतला आहे. कृषी कायदे मागे घेईपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ठिकठिकाणी शेतकरी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दिवसभर झालेल्या हिंसाचारात सुमारे 300 हून अधिक पोलीस जखमी झाले. दरम्यान, आज सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते जमा झाले. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.