भाजपचा ठाकरे सरकारला थेट सवाल, म्हणाले – ‘आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल NIA ने करावी काय?’

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन –  मुंबईत नुकतेच पोलिसांनी युरेनियमचा मोठा साठा जप्त केला होता. याप्रकरणात दोघांना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणाचा तपास NIA कडे दिला आहे. यावरून आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल 3 महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास NIA ने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल NIA ने करावी काय, ठाकरे सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?,अशी विचारणा उपाध्ये ट्विट करून केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना 12 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनी 7 किलो 100 ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी उच्चशिक्षित असून, ते एमबीए पदवीधारक आहेत. जिगर हा एका खासगी आयटी कंपनीत काम करतो, तर ताहीर हा आयात-निर्यात व्यावसायिक आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 21 कोटींहूनही अधिक असल्याचे सांगितले जात आहे.