‘मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले ! अर्थात स्क्रीनवरून’, उपहासात्मक पोस्टमधून भाजपचा ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला मोठा फटका बसला. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोकण दौऱ्यावर आहेत. यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उपहासात्मक पोस्टमधून प्रहार केला आहे. मातोश्रीतून कारभार पहात असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपने मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल केला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये लिहिले…

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर आज कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! ‘अर्थात स्क्रीनवरून… मंगळवारची सकाळ उजाडली. सीएमसाहेबांना जाग आली आणि ते हॉलमध्ये आले. अलीकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो. डायनिंग रूम, तिथून लिव्हिंग रूम, कधीतरी कॉन्फरन्स रूम… पायाला भिंगरी लागल्यागत सीएमसाहेब फिरत असतात. आज सवयीप्रमाणे अगोदर डायनिंग रूममध्ये न जाता साहेबांनी प्रवासाची दिशा वळवली आणि प्रोटोकॉल धावपळ उडाली. स्टाफला कोणतीच पूर्व सूचना नसल्याने तेथील कर्मचारीही भांबावून गेले. तिकडे लक्ष न देता सीएमसाहेब आपल्या खुर्चीत बसले.

खुर्चीच्या हातावर कोरलेल्या लाकडी सिंहांना कुरवाळत त्यांनी एक जांभई दिली. रात्री बराच वेळ आढावा बैठक सुरू होती. सारी माहिती मिळाल्यावर, संकटग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा असे आदेश देऊनच सीएमसाहेब झोपी गेले. सीएमसाहेबांनी आदेश दिल्यामुळे संकटग्रस्त भागात पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू झाली. तिकडे संकट वाढतच होते. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती, भेदरलेली मुलंबाळ कोपऱ्यात बसून बाहेरचं तांडव पाहात होती, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक टोला लगावला.

संकटग्रस्त भागातील आढावा बैठक बराच वेळ सुरू होती. सकाळी सीएमसाहेबांना रिपोर्ट पाठवायची जबाबदारी एकावर सोपवून सर्वांनी डिनर घेतले, आणि ते घरोघर परतले. सीएमसाहेब हॉलमध्ये येताच त्यांच्या स्पेशल सीईओने कानाजवळ जाऊन काही सल्ला दिला, आणि साहेब गंभीर झाले. खुर्चीच्या हातावरच्या सिंहाना कुरवाळणे थांबवून ते मनगटातलं धाग्याचं बंधन पिरगळू लागले. आता साहेब काहीतरी महत्वपूर्ण बोलणार हे सीईओने ओळखले होते. त्याने तातडीने खूण केली, आणि साहेबांसमोरच्या टीपॉयवर लॅपटॉप सुरू झाला. सीईओने पलीकडे संकटग्रस्त भागात एका अधिकाऱ्यास फोन लावून संकटग्रस्त नागरिकांस तातडीने ऑनलाइन आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

काही क्षणांतच सीएमसाहेबांच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर संकटग्रस्त नागरिक मोठ्या अपेक्षेने सीएम साहेबांकडे पाहात होते. सीएमसाहेबांनी चेहरा अधिक गंभीर केला, आणि ते बोलू लागले… ‘या संकटात मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून संकटाच्या छाताडावर पाय देऊन त्याला, पळवून लावले आहे. मदतीसाठी मी केंद्राला आजच पत्र पाठवणार आहे. माझ्या कोकणाचे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही’… असे बोलून सीएमसाहेबांनी हात उचलला. स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले होते. साहेबांनी मायेने स्क्रीनवरील त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याचे स्क्रीनवरील अश्रू पुसले, आणि आभासी सांत्वन आटोपून सीएमसाहेब नव्या आभासी आढावा बैठकीसाठी तयार झाले. उठताउठता सीईओकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले, व म्हणाले, संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तिकडे जावे लागत नाही. मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय…’ सीईओंनी मान हलवून कौतुकाने साहेबाकडे पाहिले. तिकडे ऑफिसमधून प्रेसनोट जारी झाली होती, ‘मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले!’ असं म्हणत भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.