राऊतजी, ‘कोरोनाचा हाहाकार, तुमचा आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत’; भाजपचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. देशात कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्यावर गेली आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड्स कमी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादावरून सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार होते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आली आहे. याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर देताना काही प्रश्न उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे वर्षभर हेच धोरण

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना काही सवाल उपस्थित केले आहे. केशव उपाध्ये म्हणाले, संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, संजय राऊत जी हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या वर्षभराचे धोरण आहे. कोरोनाचा हाहा:कार सुरु असताना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं तुम्ही पहा, तुमचा आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत, असा पलटवार उपाध्ये यांनी केला आहे.

मुख्यमंत्री किती वेळा बाहेर पडले ?

केंद्र सरकार मदत करत आहे. मात्र मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा देण्यासाठी बाहेर पडले ? कोरोना लढाईत कोणती ठोस पावले उचलली ? बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीर यासाठी वर्षभरात काय नियोजन केले ? गोरगरीबांना काय मदत केली ? अशा प्रश्नांची सरबत्ती केशव उपाध्ये यांनी दुसऱ्या ट्विटमधून केली आहे. वर्षभरात बदल्या पहा, त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते तर दुरावस्था झाली नसती, अशी खोचक टीका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.