महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय, तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?, भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  संगमनेर मध्ये गर्दी करू नका म्हणून सांगणाऱ्या पोलिसावरच जमावाने हल्ला केला. या हल्ल्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता?, अशी घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहणार? असा प्रश्न करत. म्हणाले, राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या राज्यात, वारंवार महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दैनंदिन पोलिसांवर हल्ले होताना दिसत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, मात्र, अजूनही पोलिसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय? तर पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत या बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर केलेल्या घोषणा एवढ्यातच कसे विसरलात? असा निशाणा उपाध्ये सरकारवर लगावला आहे.

महसूलमंत्र्यांच्या संगमनेर शहरात या राज्यात नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे हा त्यांचा गुन्हा आहे का? संगमनेरमध्ये पोलिसांनी अजूनही कठोर कारवाई केली नाही. नवाब मलिक तुमचे गृहखाते टोपी पाहून कारवाईचा निर्णय घेते का?, संगमनेरातील गुन्हेगारांवर कारवाईच्या नावाखाली पांघरूण घालण्याचे षडयंत्र रचले जाणार असेल तर त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. संगमनेरमध्ये कोव्हीड नियमांचे धडधडीत उल्लंघन झाले तरी कारवाई कोठे? नाना पटोले तुम्ही बाळासाहेब थोरातांचे गाव म्हणून गप्प बसलात काय? अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय.

पुढे उपाध्ये यांनी म्हटले की, दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस हवालदाराचा निर्घृण खून केला. पोलीस दल हादरले, मात्र, गृहखाते ढिम्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यामध्येच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका तडीपार गुंडाने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढविला. पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या अशा गुंडगिरीला जबाबदार कोण? असा सवाल देखील उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर उपस्थित केला आहे.