Video : किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘ठाकरे सरकारकडून कोरोनाबळीच्या आकडेवारीची लपवाछपवी होतेय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. मात्र असे असतानाही ठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करणारा एक व्हिडिओ ट्विटरला शेअर करत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, वसई- विरार शहरात 1 ते 13 एप्रिल या काळात 201 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र पालिकेने केवळ 23 मृत्यू दाखवले आहेत. तर चालू वर्षात जानेवारी ते 13 एप्रिलपर्यंत कोरोनाने 295 जणांचा बळी गेला आहे. मात्र पालिकेने केवळ 52 मृत्यूंची नोंद केली. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत पालिकेने 243 कोरोनाबळी लपल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर महापालिका आयुक्त गंगाधरण डी म्हणतात, या अहवालात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते. यात केवळ पालिका रुग्णालयांतील मृतांच्या आकड्यांची नोंद होते. मात्र, यापुढे खासगी रुग्णालयांतील मृतांची नोंदही अहवालात केली जाईल. त्यानंतर सोमय्या म्हणाले की, ठाण्यात स्मशानभूमींमध्ये 309 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.