‘…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार’, भाजप नेत्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी ने देखील गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. 100 कोटी वसुलींच्या आरोपांचा ईडी तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींहून अधिक कोटींची अफरातफर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा 2010, 2012 चा पैसा असो… अनिल देशमुख यांनी हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’

दरम्यान, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगी शिवाय चौकशी न करण्याचा निर्णय घेतला. तसेच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. या सर्व प्रकरणामुळे केंद्र सरकार नाराज झाल्याने त्यांनी माझी सीबीआय आणि ईडी कडून चौकशी सरु केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतूपोटी केले जात आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही’ त्यामुळे मी ज्या पद्धतीने सीबीआयला सहकार्य केले तसे ईडीला देखील चौकशीमध्ये सहकार्य करेन, असेही अनिल देशमुख यांनी सांगतले.