‘महाराष्ट्राला पक्के माहीत आहे, शत्रू कोण अन् मित्र कोण’, फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या एका पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी मोठ्या संख्येने मंत्र्यांना तास न् तास बैठक घ्यावी लागते. एवढ्या बैठकी कोरोनाविरोधातील लढाईसाठी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचे चित्र आज असे नसते, असे सांगताना सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरे असते, फेकाफेकीसाठी तीन लोक लागतात, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी बुधवारी आघाडी सरकारच्या तीन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करत त्यांचे सर्व दावे खोडून काढले. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत लगेच उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे विसंगत माहिती दिली आणि माझी पत्रकार परिषद खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. एकतर त्यांनी अपुरी माहिती आहे किंवा माहिती न घेता किंवा माहिती असूनही चुकीचे प्रितपादन केले आहे. गहू दोन रुपये किलो आणि तांदूळ तीन रुपये किलो हा केंद्र सरकारकडूनच राज्यांना येतो. शिवाय, या दराने राज्य सरकार तो विक्री करतो आणि ते पैसे जनतेकडूनच वसुल होतात. केंद्र सरकार तो 24 रुपये आणि 32 रुपयांनी विकत घेतो. तो राज्य सरकारला मिळाला नाही आणि तो कुठे आहे, हा प्रश्न अनिल परब यांना का पडावा, हे मला कळत नाही. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी द्यायची, यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्के माहित आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे
– कापूस खरेदीसाठी सर्व पैसे केंद्र सरकार देते. त्याप्रमाणे ते पैसे केंद्राने दिले आहेत.
– रेल्वेच्या तिकीटांसाठी राज्य सरकार 7 ते 9 लाख रुपये देते. मात्र, केंद्राला ती रेल्वे चालवण्यासाठी 50 लाख रुपये लागतात.
– टॅक्सचे पैसे खातेदारांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत.
– मुंबई कोरोना चाचणी कमी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात 5 टक्के लोक पॉझिटिव्ह निघतात. त्यापैकी महाराष्ट्रात हे प्रमाण 12 ते 13 टक्के आहे. तर मुंबईत मे महिन्यात हे प्रमाण 32 टक्के इतके आहे.
– 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 पीपई किट देण्यात आले आहेत. 16 लाख एन 95 मास्क दिले आहे. ही सामुग्री विकत घेण्यासाठी 468 कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले आहेत.
– प्रत्येक वेळेस एक अभासी आकडा फेकायचा आणि केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे, इतकंचं सांगण्याचं काम राज्य सरकारकडून सुरु आहे.
– दिव्यांगांना केंद्राने दिलेले 122 कोटी रुपये रेग्युलरपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.
– केंद्राने नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्य़ंत राज्याचे जीएसटीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार राज्य सरकारकडून चालल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
– मुंबईत रुग्णांना बेड मिळत नाहीत, त्यांचे काय करणार हे सांगा ? मुंबईत रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यावर मृत्यू होतात, ते थांबविण्यासाठी काय करणार हे सांगा ?