बिहारमध्ये एनडीए संकटात ? कारागृहातून लालूंचा आमदारांना फोन, सुशील मोदी यांचा आरोप

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या एक दिवस अगोदरच राजकारण तापले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक मोबाइल नंबर शेयर करत रांचीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप केला आहे की, ते फोन करून एनडीए आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. लालू एनडीए आमदारांना मंत्री बनवण्यापर्यंत ऑफर देत आहेत.

सुशील मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना राजद प्रवक्ता मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले की, सुशील मोदी लालू फोबियाने ग्रस्त आहेत आणि खोटी वक्तव्य करत आहेत. उप-मुख्यमंत्री पदावरून हटवल्याने चर्चेत राहण्यासाठी ते असे प्रकार करत आहेत.

सुशील मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये मोबाइल नंबर 8051216302 चा उल्लेख करत म्हटले आहे की, ज्या नंबरवरून आमदारांना फोन आले आहेत. या नंबरवर सत्यता पडताळण्यासाठी जेव्हा फोन केला तेव्हा थेट लालू यादव यांनी कॉल रिसिव्ह केला. माजी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले, लालू प्रसाद यांच्याशी मी बोललो सुद्धा आणि असे घाणेरडे प्रकार करू नयेत असे सांगितले. आमदारांना फोडण्याचा प्रयत्न योग्य नाही आणि या प्रयत्नात आपण यशस्वी होणार नाहीत असे म्हटले. त्यांची इच्छा कधीही यशस्वी होणार नाही.

https://twitter.com/SushilModi/status/1331256676469510146

बिहार विधानसभा अध्यक्ष पदासाठी एनडीएकडून विजय सिन्हा, तर महाआघाडीकडून अवध बिहारी चौधरी यांना उमेदवार करण्यात आले आहे. बुधवारी सभागृहात कार्यवाही सुरू होईपर्यंत जर विरोधकांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर मतदानाने विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होईल. अशावेळी सुशील मोदी यांच्या आरोपानंतर हा प्रश्न उपस्थित होत आहे की, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही महाआघाडी अन्य प्रयत्न करून सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे का.

चारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यांच्यावर झारखंडमध्ये एकुण पाच प्रकरणे सुरू आहेत. यापैकी चार प्रकरणात त्यांना शिक्षा मिळाली आहे. सध्या ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत.