कुत्रा अंगावर सोडण्याच्या कारणावरुन वाद ! माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुत्रे फिरायला घेऊन गेलेले असताना आमच्या अंगावर कुत्रा सोडतोस काय, यावरुन झालेल्या वादात आरडाओरडा ऐकून दारु पिणार्‍या तरुणांना जाब विचारण्यास आलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना तेथे बसलेल्या तरुणांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटीच्या रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमर सयाजी बनसोडे (वय २६), विनोद सुरेश गंदे (वय २६ दोघे रा. गणंजय सोसायटी, श्रावणधारा वसाहत, कोथरुड), तेजस कांबळे, मिथून हरगुडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे सासरे शनिवारी सायंकाळी कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला जात होते.

त्यावेळी सोसायटीच्या बाहेर जवळच्या सोसायटीतील अमर बनसोडे, विनोद गंदे हे तेथे दारू पित थांबले होते. त्यांनी कुत्रा अंगावर सोडतो काय या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी हे चौघे चारचाकी गाडीतून त्यांच्या मागोमाग आले. त्यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारण्यासाठी काचेची बाटली व दगड फेकून मारला.

त्यामुळे फिर्यादीचे सासरे हे घाबरुन जोरात आरडाओरडा करीत सोसायटीत पळाले. त्यांचा आवाज ऐकून राहुल कोल्हे, विलास कोल्हे हे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही या चौघांनी त्यांना मारहाण केली. तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी तेथे आल्या. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना ढकलून दिले. हा आरडाओरडा ऐकून माजी आमदार मेधा कुलकर्णी याही तेथे पोहचल्या. तेव्हा या चौघांनी सर्वांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण करुन तुमचा मुडदा पाडण्याची व बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.