दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहिल : प्रकाश जावडेकर

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडिल आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे भ्याड कृत्यू असून दहशतवाद संपेपर्यंत ही लढाई सुरूच राहिल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजपा नेते शेख वसीम, त्यांचे वडील व भाऊ यांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे भ्याडपणाचे कृत्य आहे. दहशतवाद संपेपर्यंत हा लढा सुरूच राहिल, असे जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला. शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. ते कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हते. सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता.

वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकार्‍यांना कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. वसीम यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आठ सदस्यीय सुरक्षा टीम पुरवण्यात आली होती. घटनेनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील शोक व्यक्त केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. बांदीपोरामध्ये भाजपा नेते वसीम बारी आणि त्यांच्या भावाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे आम्हाला दु:ख झाल्याचे म्हटले आहे.