J & K : कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते अहमद खांडे यांची केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून भाजप नेते व सरपंच सज्जाद अहमद खांडे यांना ठार केले. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांना कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथे त्यांच्या घराबाहेर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सुरुवातीच्या वृत्तानुसार, मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह एका प्रवासी छावणीत राहत होते. तथापि, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि वेसूला जाण्यासाठी निघाले. जेव्हा ते त्यांच्या घरापासून फक्त 20 मीटर अंतरावर होते तेव्हाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. या तिघांवर बांदीपुराच्या एका पोलिस स्टेशनजवळील बारीच्या दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्यात काश्मीरी पंडित सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार केले होते.