’ते शब्द टाळायला पाहिजे होते’, राज्यपालांच्या वक्तव्यावर HM अमित शहा देखील नाराज ?

नवी दिल्ली : राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. हे पत्र खुपच वादग्रस्त ठरले होते. यातील आक्षेपार्ह भाषेमुळे राज्यपालांवर मोठी टीका झाली होती. आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केले असून कोश्यारी यांनी ते शब्द टाळायला पाहिजे होते, असे म्हटले आहे. ’न्यूज18’ वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अमित शहा बोलत होते.

मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकार उशीर करत असल्याने राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यात कोश्यारी यांनी म्हटले होते की, तुम्ही आता अचानक सेक्युलर झाला आहात की काय? राज्यपालांच्या याच वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याच वक्तव्यावरून अमित शहा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरे झाले असते.

अमित शहा म्हणाले, मी ते पत्र वाचले. त्यांनी एक संदर्भ देताना पत्रात तसा उल्लेख केला. मात्र ते टाळायला हवे होत. राज्यपालांच्या पत्राबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने आता विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले आहे. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा सेक्युलर असण्याला इतका विरोध पाहाता, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर मोठी टीका झाली होती.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले हे पत्र मीडियात सुद्धा प्रसिद्ध केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यावरून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक पत्र लिहून राज्यपालांना शालजोडीतील दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते की, महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्‍यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला होता.