‘सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे ? कशी आणणार गुंतवणूक ? ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2 लाख 50 हजार नवे रोजगार आणि 61 हजार कोटींची गुंतवणूक ? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग ? आधी हे सांगा आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलात दिलासा कधी देणार? निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार? अशाप्रकारे भाजप नेते आमदार आशिष शेलार (bjp-leader-ashish-shelar) यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे, असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने 25 भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाला. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या मुद्द्यावरूनच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

कोरोना संकटातही उद्योग विभागाचे गुंतवणुकीचे उद्दीष्ट पूर्णः मुख्यमंत्री ठाकरे
61 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या वेळी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते. करोनाचे संकट असतानाही राज्याच्या उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.