‘काँग्रेसचे हमाल दे धमाल’, आशिष शेलारांचा शिवसेनेवर ‘निशाणा’

बई : पोलीसनामा ऑनलाइन – काल भाजपने एक मोठे विधेयक राज्यसभेत पास केले. गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात काल 117 विरुद्ध 92 च्या फरकाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं. लोकसभेत पाठींबा देणाऱ्या शिवसेनेने मात्र राज्यसभेत मतदान सुरु असताना सभात्याग केला आणि मतदानावर बहिष्कार टाकला. शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

रोज नवे युटर्न.सत्तेसाठी पहा कशी कमाल.काँग्रेसचे हमाल दे धमाल! असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत दोन ट्विट केले आहेत.

काय म्हणालेत आशिष शेलार ट्विटद्वारे
देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता, त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको ? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल ! अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लबोल केला आहे.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत तसेच जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले अशा शब्दात आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले..काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले ! असे देखील आशिष शेलार ट्विटमध्ये म्हंटले.

शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाबाबत काही प्रश्न विचारले होते मात्र त्याची समाधान कारण उत्तरे न मिळाल्याने शिवसेनेने मतदानावेळी सभात्याग केला. शिवसेनेच्या या निर्णयाचे स्वागत करताना पी चिदंबरम म्हणाले की, शिवसेनेने घेतलेला निर्णय हा योग्य बदल आहे.

लोकसभेत शिवसेनेने विधेयकाला पाठींबा दिल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. राहुल गांधी यांनी देखील नाव न घेता शिवसेनेवर टीका केली होती. तर काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेने निदान लोकसभेत अनुपस्थित रहायला हवे होते अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/