सत्तेसाठी एवढी लाचारी ? कुठे फेडाल ही पापे सारी ? भाजप नेते शेलारांचा शिवसेनेला टोला

पोलीसनामा ऑनलाईनः स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’ची भाषा आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत. सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? असे म्हणत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1350677644539518977

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरणावरुन राजकराण तापले आहे. कॉग्रेसने औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे नामांतरावरून भाजपाही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे. यानंतर संभाजीनगरच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हटल होत खा. राऊतांनी रोखठोकमध्ये ?
औरंगजेबाच्या जीवनामध्ये कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना देखील हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही 25 वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे, असे राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात म्हटले आहे.

राज्यातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणत असत, असे खा. राऊत यांनी आपल्या सदरात म्हटले आहे.