‘हे कसले हिंदुत्वाचे पुजारी ? हे तर सत्तेचे लाचारी !’, भाजपा नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना काळात बंद असलेली राज्यातील देवस्थानं आणि मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप आमने सामने आले आहेत. मला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे कसले सत्तेचे पुजारी ? हे तर सत्तेच लाचारी ! असा टोला शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

कोरोनाला रोखण्याासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी आज भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंदिरं उघडण्याबाबत विचारणा केली होती. या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचाही उल्लेख केला होता. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तुमच्याकडून हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही असा टोला लगावला होता. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी सीएम ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “उद्धव
ठाकरे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत शेजारी-शेजारी बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचं भूमीपूजन ई पद्धतीनं करा असा अनाहूत सल्ला दिला होता. भारत तेरे तुकडे हो हजार म्हणणाऱ्यांचं मुंबईत स्वागत केलं. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते.”

“एवढंच नाही तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही हे कसले हिंदुत्वाचे पुजारी ? हे तर सत्तेचे लाचारी !” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.