आशिष शेलारांची ठाकरे पितापुत्रावर खरमरीत टीका, म्हणाले – ‘विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश दिल्या नंतर आता मेट्रो कारशेड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेनच्या जागेवर स्थानांतरित करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरु केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाआघाडी सरकार आणि भाजप यांच्यात वाद सुरु झाला आहे. नागपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या चचपणीवर आक्षेप घेत सरकारवर उठवली होती. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध केला, मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉरसुद्धा. केवळ विरोध आणि विरोधच करण्यात आला, असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आता कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव महाविकास आघाडी सरकारकडून आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटत आहेत. हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधकच आहेत, अशी जहरी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

राज्य बुडवायला निघालेले सल्लागार कोण हे समजत नाही: फडणवीस
राज्य सरकारचे सल्लागार कोण आहे, हे समजत नाही. जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे. बीकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळं तेथे २५ हेक्टर जागेसाठी तो खर्च २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करत असल्याने पाचशे कोटी रुपयांचं काम ५ हजार कोटींवर नेलं जात आहे. त्यामुळं सरकार तर राज्यातील सर्व प्रकल्प बंद करायला निघाली आहे, असा आरोपहि त्यांनी केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी न्याय व्यवस्थेवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांनी टीका केली. सरकारनं चुकीचं काम करायचं आणि न्यायालयानं चूक दाखविल्यावर न्यायव्यवस्थे दोष द्यायचा, हे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. सुनावणी दीर्घ काळ सुरु राहणार असल्याने सरकारने दुसरीकडे जागेची चचपणीस सुरुवात केली आहे. सध्या एका जागेचा सरकार विचार करत असून त्यावरून भाजपने कांगावा सुरु केला तूर्त तरी निर्णय झाला नसला तर त्याच जागेवर कारशेड उभरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.