‘झुकली रे झुकली’ ! मराठी बाणा सांगणारी शिवसेना झुकली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपकडून राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका होत आहे. यातच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“नाही धार, सच्चाईकरांच्या शब्दांना आज दिसली, रोखठोक लेखणी त्यांच्याकडे पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली ? छे… छे… झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली”, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही सावरकरांच्या मुद्यावरून ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकरी खायची, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/