‘हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का’ ? भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ‘एकेरी’ भाषेत टीका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CAA आणि NRC राज्यात लागू होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का ? अशी टीका केली होती. राज्यात कायद्याचं राज्य चालतं आणि राज्य हे घटनेनुसार चालतं त्यामुळे संसदेने मंजूर केलेला कायदा कसा लागू करणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं असंही शेलार यांनी म्हटलंय. नालासोपाऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान शेलार बोलत होते.

हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ?, असा शब्दप्रयोग शेलारांनी केला आहे. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशी टीका करणं हे तुम्हाला शोभत नाही. मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही असे आव्हाड यावेळी म्हणाले.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपण कोठून निवडणूक लढवणार याबाबत खुलासा केला आहे.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्नातही नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन. आता मला वाटतं विधान परिषदा येतील असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं ? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या निवडणुकीसंदर्भात सूचक इशारा दिला आहे.