आशिष शेलारांनी केलं उध्दव ठाकरेंच्या मुलाचं कौतुक, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – २०१९ साली शिवसेनेनं भाजपसोबतची आपली २५ वर्षाची युती तोडली आणि राष्ट्रवादी, काँग्रेसबरोबर जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. अलीकडेच या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यादरम्यान, भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मात्र, आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

आशिष शेलार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सतत हल्ला चढवला. मात्र, आज त्यांनी उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आलं. निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी एक महत्वाचे सागरी संशोधन केलं आहे. यावरुन शेलार ट्विट करत म्हणाले, “उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन ! करोनाकाळातही ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पाडली, हे कौतुकास्पद ! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा !,” असे म्हणत त्यांनी तेजस याची पाठ थोपटली आहे.

कोणता नवीन शोध लावला तेजस यांनी?

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत संशोधन केल्यानंतर तेजस ठाकरे यांनी मेघालयात महत्वपूर्ण संशोधन केले. मेघालयातील खासी टेकड्यांमधून तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी अत्यंत सुंदर व तितक्याच दुर्मिळ अशा ‘चन्ना स्नेकहेड’ माशाचा शोध लावला. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अ‍ॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.