Video : पुण्यातील ‘त्या’ युवतीच्या मृत्यूप्रकरणात भाजप नेत्यानं घेतलं मंत्र्याचं नाव, मुख्यमंत्री ‘राठोडगिरी’ सहन करणार का ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुजा चव्हाण नावाच्या पुण्यातील एका 22 वर्षीय तरुणीनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यात विदर्भातील एका मंत्र्याचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील राठोडगिरी सहन करणार का ? असा सवालही त्यांनी केला आहे. राठोडगिरी असा शब्द वापरत त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला आहे.

भातखळकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांपासून महिलांना धोका आहे. कोणी बलात्काराची तक्रार करतंय तर कोणी मंत्र्यांनी मुलं पळवल्याची तक्रार करतंय. आता तर मंत्र्यांमुळं तरुणी आत्महत्या करायला लागल्या आहेत. त्यांच्या दबावामुळं नातेवाईक तक्रार करायला पुढं येत नाहीत. रक्षकच भक्षक बनले आहेत. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

नेमकं प्रकरण काय ?

पुजा चव्हाण (22) या तरुणीनं गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महंमदवाडी परिसरात हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला. विदर्भातील एका मंत्र्यासोबत तिचे प्रेम संबंध असल्यानं तिनं आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत कुणीच मंत्र्याचं नाव उघड केलं नव्हतं. परंतु भातखळकरांनी थेट राठोडगिरी म्हणत मंत्री सेनेचा असल्याचं म्हटलं आहे.