‘कोरोना’बाबत मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची बनवाबनवी : अतुल भातखळकर

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मुंबईत 1 हजार 395 रुग्णांचे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती महापालिका व आरोग्य विभाग सांगत आहे. मात्रा, कोरोनाची लागण असलेल्या 451 रुग्णांची माहिती ‘कोरोना मृत्यू’ म्हणून नोंदविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याशिवाय पालिकेच्या ‘डेथ ऑडिट कमिटी’पुढे गेल्या आठवड्यापर्यंत सादर न झालेल्या सुमारे 500 प्रकरणांचा विचार केल्यास मुंबईतील सुमारे 950 मृत्यू हे वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची भीती पालिकेतील काही अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

महापालिका आणि राज्य सरकारची जीवघेणी बनवाबनवी, असे म्हणत भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून त्यांच्यावर टीका केली.मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यावर सुरुवातीला बहुतेक रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात होते. त्यावेळी चाचण्या करण्याची यंत्रणा प्रामुख्याने कस्तुरबा व केईएम रुग्णालयात होती. हळूहळू मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली व मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले. यातूनच हे मृत्यू कोरोनाचे दाखवायचे की नाही, हा संभ्रम पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला. आज मुंबईत कोरोनाचे एकूण रुग्ण 58 हजार 226 आहेत. तर मृतांची संख्या 1 हजार 395 आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्या रुग्णालयातील 451 कोरोना रुग्णांची नोंद ‘कोरोना मृत्यू ‘ दाखवली नसल्याचा मुद्दा आता आरोग्य विभागाने उपस्थित केला आहे. यातून हे मृत्यू का दडविण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.