Pooja Chavan Suicide Case : वनमंत्री राठोड-मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा निशाणा, म्हणाले – ‘बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येवरून राजकारण पेटलं आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. पूजाच्या मृत्यूनंतर अनेक फोटो, ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. त्यामुळे संजय राठोड अजून अडचणीत येणार आहेत. बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांची लगेच भेट न घेता त्यांना दीड तास ताटकळत ठेवले. या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त २ मिनिटांचा वेळ दिल्याचे समजत आहे. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर
.”मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली. बहुधा त्यांनी कानात सांगितलं असावं मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

राठोड यांनी घेतली मुख्यामंत्र्यांची भेट
बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. मात्र मुख्यामंत्र्यांची भेट घेण्यासाठी संजय राठोड यांना दीड तास वाट पाहवी लागली. त्यानंतर मुख्यामंत्र्यांनी त्यांची फक्त २ मिनटं भेट घेतली. संजय राठोड जेव्हा वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीमध्ये व्यस्त होते. यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.