‘रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला अन् बाण धनुष्यात घुसला’ ! ‘या’ भाजप नेत्याने लगावला टोला

पोलीसनामा ऑनलाईन – भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला, असे म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर (BJP leader MLA Atul Bhatkhalkar) यांनी टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरवरून वायकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र शेअर करत निशाणा साधला आहे.

 

 

 

 

 

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी ED ने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे 72 कोटीं रुपयांची संपत्ती शुक्रवारी जप्त केली. बँक घोटाळ्यात 4 हजार 335 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली. पीएमसी बँकेतील घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. यावरून आता आ. भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण?
पीएमसी घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ED ने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली. तसेच ED चौकशीत असेही समोर आले आहे की, राऊतने षडयंत्र करत 95 कोटींचा फेरफार केला. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे / करार मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समोर आले.

वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीला बोलावले
या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत 29 डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी 5 जानेवारीपर्यंत ईडीकडे वेळ मागितला. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावत 5 जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.