विरार हॉस्पिटल आग : ‘राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो’; ‘या’ भाजप नेत्याचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल मध्यरात्री विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागली. या आगीमध्ये १३ जण होरपळून मृत्यू पावले. तसेच काहींची प्रकृती गंभीर अवस्थेत होती. अशी आग एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याचे समजते. आगीमध्ये मृत्युमुखी पडल्याच्या वारशांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि गंभीर जखमी रुग्णांना १ लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीय. तर या घटनवरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक भाष्य करत हि राष्ट्रीय बातमी नसल्याचं ते म्हणाले. यावरून भाजपचे अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत.

विरारच्या घटनेवरून राजेश टोपे यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्यावर जोरदार टीका केलीय. भातखळकर म्हणाले, किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे, अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल २ अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो, अशा शब्दांत अतुल भातळकर यांनी टोपे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले होते?
टोपे म्हणाले होते की, आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो. ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. मात्र, विरारची घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असे राजेश टोपेंनी म्हटलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरबाबत बोलणार आहोत. (विरार रुग्णालय आग) ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असे टोपे म्हणाले.