भाजप नेत्याचा नवाब मलिक यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘अजितदादांचा राजीनामा मागायचा तर सरळसरळ मागा, द्राविडी प्राणायम कशाला?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात 5 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी अवघ्या देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागले होते. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 213 जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला आहे. बंगालमधील भाजपच्या पराभवावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. मलिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. बंगालमधील मतदारांनी नाकारल्यामुळे गृहमंत्री शाह यांनी राजीनामा द्यावा, असे मलिक म्हणाले. अहो, नवाब मलिक अजितदादांचा राजीनामा मागायचाय तर सरळसरळ मागा. हे द्राविडी प्राणायम कशाला? असे म्हणत भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. येथे अनेक अनेक दिग्गजांनी सभाही घेतल्या होत्या. पंढरपूरमधील महाभकास आघाडीचा पराभव म्हणजे ठाकरे सरकारला लोकांनी नाकारले असे मी म्हणणार नाही. यांना स्वीकारले कोणी होते? हे जबरदस्तीने जनतेच्या डोक्यावर बसले. समाधान आवताडे यांचा विजय हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अचूक रणनीतीचा परिणाम असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.