अतुल भातखळकरांचा सवाल, म्हणाले – ‘राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइऩ – देशभरात 1 मेपासून तिस-या 18 वर्षावरील लोकांना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. असे असताना मात्र आरोग्य मंत्री राजेश टोेपेंच्या जालना जिल्ह्यात लसींचा अधिकचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्याला 10 दिवस पुरेल इतका अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

अतुल भातखळकर यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 31 मार्चला केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसीचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार इतकाच कोटा असताना 60 हजार डोस अधिक दिले आहेत. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? असे भातखळकरांनी म्हटले आहे. डॉ. राजेश टोपे विधानसभेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपेंनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या जिल्ह्याला अधिकचा लस पुरवठा करण्यास सांगितले होते. मात्र लसींच्या पुरवठ्यात कोणत्याही जिल्ह्याला प्राधान्य दिले गेले नसल्याचा दावा टोपेनी केला आहे. राज्याच्या तुलनेत जालन्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याकडेही टोपे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतर जिल्ह्यात सरासरी 27 टक्के लोकांचे लसीकरण होताना जालन्यात मात्र हीच टक्केवारी 18.1 टक्के असल्याची आकडेवारी टोपेंनी दिली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला प्रोत्साहान देण्यासाठी जालना जिल्ह्याला अधिकचे डोस दिले गेले असावेत, असे ते म्हणाले.