उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावर पवार बोलले, भाजपा नेते म्हणाले – ‘सोनाराने कान टोचले !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना आदेश देताना म्हटले की, राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा. ठाकरे यांच्या या आदेशावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर तिचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना दिल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. कांदाप्रश्नी नाशिक दौर्‍यावर असताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पवारांच्या याच प्रतिक्रियेवरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ’हा घ्या घरचा आहेर… सोनाराने कान टोचले ते बरं झालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या एकहाती राज्यात भगवा फडकवण्याच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत, भाजपाचे मोठे संकट आले आहे. त्यामुळे, या संकटाचा सामना करण्यासाठी, हे भाजपाचे गडांतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत. उद्धव ठाकरे जे बोलले ते, त्यांची जी भूमिका आहे, त्यानुसार प्रत्येक पक्ष हे स्वप्न पाहत असतो, महत्वाकांक्षी असणे यात काही गैर नाही. आमचेही तेच स्वप्न आहे, आमचीही तीच महत्वकांक्षा आहे. एकहाती सत्ता काँग्रेसची आली पाहिजे, वर्षांनुवर्षे काँग्रेसचाच तिरंगा फडकत आहे. पण, आजच्या परिस्थितीत भाजपाच्या रुपाने जे संकट आहे, त्या स्थितीत आम्ही तिन्ही पक्ष मजबूत आहोत, 5 वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वासही काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केला.

You might also like