…तर मनसेशी युती करू, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या 2022 मध्ये होणा-या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेचा सर्वांत मोठा गड असलेल्या मुंबई महापालिकेवर यंदा भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारे विधान केले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( bjp-leader-chandrakant-patil) यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने रिअ‍ॅक्ट होतात. पण आमचे परप्रांतीयांबाबतचे धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचे धोरण बदलायला हवे. त्यांनी परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असे पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबद्दल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते दरेकर?
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.