‘मुख्यमंत्री सतत धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील जनतेला आश्वासक मुख्यमंत्री हवा होता. पण मुलाखतीमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Thackeray) सतत धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एका मुख्यमंत्र्याच्या तोंडी असे शब्द शोभणारे नाहीत, त्यांनी शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजेत, मुख्यमंत्रिपदाची गरीमा राखली पाहिजे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp leader chandrakant patil) यांनी लगावला आहे. तसेच आजचा दिवस म्हणजे अपयशी, संवेदनाहीन आणि गोंधळलेल्या सरकारची वर्षपूर्ती असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाटील यांनी शनिवारी (दि. 28) भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण, शाळांची सुरुवात, अंतिम वर्ष परीक्षा, वीजबिलांचा प्रश्न आदी कोणत्याच बाबतीत सरकारचे ठोस धोरण नाही. आघाडी सरकारमधील मंत्र्यात समन्वय नाही असे ते म्हणाले. ज्यांचा झेंडा वेगळा, भूमिका, ध्येयधोरणे वेगळी असे एकमेकांना पाण्यात पाहणारे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी अनैसर्गिक आघाडी करून सरकार बनवले. पण त्यांना सरकार चालवता आले नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने एसईबीसी कोटाच रद्द केला. या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, पण अद्याप ती पूर्ण झाली नाही.

तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती सरकारने नीट हाताळली नाही. देशाचा मृत्यू दर 1.46 टक्के होता, तर महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.6 टक्के होता. वीजबिलाबाबत तर सरकारने घूमजाव केले आहे. यामधून सरकारमधील मंत्र्यात समन्वय नसल्याचे दिसून आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला असल्याचे पाटील म्हणाले.