सुप्रिया सुळेंच्या लसीच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा टोला, म्हणाले – ‘हे हास्यास्पद’

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनावरील लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी दावा केल्यास तुम्हाला सांगता येईल असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. खा. सुळे यांनी पुणे दौ-यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर हा निशाणा साधला होता. त्यानंतर खा. सुळे यांचा हा दावा हास्यास्पद असल्याचे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. सुळे यांना टोला लगावला आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या करोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार? असे कौतुकाचे उद्गार काढणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘त्या स्वप्नात आहेत का?’ असा प्रश्न पाटील यांनी केला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा दावा हास्यास्पद असल्याचे म्हणत रविवारी त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कधीकधी आपण कुठे राहतो याचाच प्रश्न पडतो. पुण्यात ही लस विकसित झाली ते कोण नाकारत आहे. परंतु त्याला आर्थिक साहाय्य कोण करते, त्यावर लक्ष कोण ठेवते, लसीचा आढावा घ्यायला कोण आले हे पाहायला हवे. जर बारामतीत असत तर बारामतीला श्रेय दिले असते. असे म्हणत पाटील यांनी टोला लगावला. आम्ही पण पुणेकर आहोत आम्हालाही ते मान्य आहे. म्हणून भारताने लस विकसित केली, पंतप्रधानांनी यात लक्ष दिले आहे. आता लस देण्याचं नियोजन किती मोठे आहे. हे आता सुप्रिया सुळे करणार का ? की हे आता बारामतीमध्ये तेथील लॅबमध्ये चालणार असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन दावा केला तर गैरसमज करु नये असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला होता. या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसेच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी दावा केल्यास तुम्हाला सांगता येईल असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.