चंद्रकांत पाटील यांनी उडविली राऊतांची ‘खिल्ली’, म्हणाले – ‘कोण संजय राऊत ?’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी साईदर्शनासाठी शिर्डीमध्ये साईदरबारी आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारताच, पाटील यांनी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देत चांगलंच तोंडसुख घेतलं. कोण संजय राऊत ? असा उपरोधिक सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी करून संजय राऊत यांची खिल्ली उडवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरूय आणि पुढेही सुरू राहिल. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना उद्देशून यावेळी केला.

शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिसवाल करत टर उडवली. ते म्हणाले, एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला मानायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा. राज्यघटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचं नाही का? न्यायालनाने निर्णय द्यायचा नाही मग काय यांची दादागिरी चालणार का? असा सवाल देखील केला. ह्यांना निवडणूक आयोग, न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून लगावला.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केलीय. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यात एवढी ताकद असती तर महाराष्ट्र राज्यात 80 तासांचं सरकार आलं, त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार का नाही टिकवले?. ते आमदार अजित पवार यांना टिकवता आले असते तर सरकार राहिलं असतं. तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय… का? आमच्या लोकांना आकर्षित करता, असाही उपहासात्मक टोला पाटलांनी लगावला.

अजितदादा खूप चांगले नेते , चांगल काम करतात. गंमत निर्माण होईल, असं बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू. अन्यथा, तुम्हाला जे करायच ते करा, असा खोचक सल्लाही पाटील यांनी दिलाय.

निवडणुका असू दे किंवा निर्णय असू देत शिवसेना स्वत: चे प्रचंड नुकसान करून घेतेय. पण, मी असं काही म्हटलं की, संजय राऊत यांना सत्तेशिवाय झोप येत नाही, तर ते लगेच अग्रलेख लिहणार…, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आम्हाला उत्तम झोप लागते…आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र, आता शिवसेना पक्ष संपत चाललाय.

महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात भाजप पूर्ण ताकदीनं उतणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 111 असं तीनच होणार, दोन होणार नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्त असणार. तीन जण एकत्र आल्यावर मतांचे एकत्रीकरण होणारच. ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा असा प्रयत्न राहील. मात्र, आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार आहे, असंही त्यांनी दावा केला.

शिवसेनासोबत नसल्याने आमचं नुकसान होत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय. मात्र, शिवसेना सत्तेत असताना त्यांचंही मोठं नुकसान होतंय, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंना ’उठा’ आणि शरद पवार यांना ’शपा’ असं म्हणणार का ?
चंद्रकांत पाटील म्हणाले, मला चंपा बोललं जातंय. मात्र, आम्ही त्यास उत्तर देत नाही. मुख्यमंत्री यांना ‘उठा’ आणि शरद पवार यांना ‘शपा’ असं म्हणणार का ? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निवडणूक संपल्यावर 5 वर्षे एकत्र काम करावं. मात्र, गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीनं राग मनात धरून सरकार चालत नाही, असंही मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.