मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षासाठी जन्मले आहेत, प्रशासन चालवण्यासाठी नाहीत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. ते प्रशासन चालवण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पक्ष चालवणे आणि प्रशासन चालवणे या वेगवेगळ्या गोष्टी असून, त्यांना प्रशासनाबाबत शंभर प्रश्न विचारले, तर कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही, असा सणसणीत टोलाही पाटील यांनी कोल्हापुरात वार्ताहरांना बोलताना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिले. ते नागरिकांच्या समस्या ऐकायचे आणि संबंधितांशी संपर्क साधून त्यांना मदत करायला सांगायचे. त्यांनी नागरिकांना वेळ दिला. उद्धव ठाकरेंनी तोच वारसा चालवला. कोणत्याही प्रभागातून निवडून येऊ शकत असतानाही ते कधी नगरसेवक झाले नाहीत. आमदार, खासदार झाले नाहीत. प्रशासकीय अनुभव नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले.”

“एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेने जाण्याची गरज त्यांना वाटली नाही. कारण ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मलाच आले नाहीत. पक्ष चालवणे आणि प्रशासनाचा गाडा हाकणे हे संपूर्ण वेगळे विषय असून, प्रशासन चालवताना तुम्हाला प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो अथवा त्याबाबतची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,” असेही पाटील यांनी सांगितलं.

जनतेला दिलासा देणे आवश्यक

वाढीव वीजबिलांसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “वीजबिलात सवलत देण्याची ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्याबाबतची फाईल अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवली होती. निधी नसल्याचे कारण सांगून अजित पवारांनी ती फाईल माघारी पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करून इथे वळवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होते,” असेसुद्धा पाटील यांनी म्हटलं.

You might also like