Chandrakant Patil : ‘…तर भाजपासमोर तुमचा निभावही लागणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 213 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. तर भाजपाला 100 च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आले आहे. बंगालच्या या ऐतिहासिक निकालाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या निकालवरून राज्यातील महाविकास आघाडी भाजपाला लक्ष्य करत आहे. मात्र या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार असे पाटील यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने पाटील यांनी महाविकास आघाडीला थेट आव्हान दिले आहे. याबाबत पाटील यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळ लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. पंढरपुरात एकट्या भाजपच्या समोर तीनही पक्ष एकत्रित असून सूध्दा आमचा पराभव करू शकले नाहीत. मग हे वेगवेगळे लढले तर यांचा निभावच लागणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3, 733 मतांनी पराभव करत विजय संपादन केला आहे. पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक जाहीर झाली होती.