एकनाथ खडसेंवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘रात गयी, बात गयी…’

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाष्य करण्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. त्यांनी प्रतिक्रिया देताना एवढंच म्हटलं की, ‘रात गयी, बात गयी…’

आज पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या दरम्यान एकनाथ खडसेंबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले, मात्र या विषयावर त्यांनी बोलणं टाळलं. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सूचित केले की आता खडसे हा विषय कायमचा संपला आहे.

दरम्यान शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपात असताना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख केला. तसेच ते म्हणाले की माझी ताकद काय आहे हे मी जळगावमध्ये मेळावा घेऊन दाखवून देईल, खडसेंच्या या इशाऱ्यावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी काल खडसेंना टोला लगावला होता. ‘राष्ट्रवादी आता खडसेंना काय देते ते पाहूया. खडसे यांची राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची वेळ ही दुपारच्या दोनची होती. मात्र कार्यक्रमाला उशीर झाला. खडसे यांना काय द्यायचं याबाबत अद्याप ठरलेलं नसावं, तुमचं समाधान होईल असं देऊ’ सध्या इतकंच आश्वासन त्यांना देण्यात आल्याचं पाटील यांनी म्हटलं.

तसेच पाटील खडसेंवर चिमटा काढत म्हटले होते की, ‘समाधान मानायचं झालं तर ते लिमलेटच्या गोळीवरही मानता येतं, पण ते मानता आलं पाहिजे. त्यामुळे खडसेंना लिमलेटची गोळी मिळते की कॅडबरी हे लवकरच समोर येईल. त्यावर ते समाधानी असतील की मग पर्याय नसल्याने पुढे जातील हे देखील समजेल.

You might also like