जयंत पाटलांच्या ‘विशेष प्रेम’ शब्दाबाबत चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह सात समित्यांच्या सभापती निवडीवेळी गोंधळामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी उघडरित्या नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापौर गीता सुतार यांनी शहराच्या विकास कामासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते. या भूमिकेचे स्वागत करत शहराच्या विकास कामासाठी सर्व पक्षांनी मिळून काम करण्याची पद्धत चांगली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

महापौर गीता सुतार यांनी शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांना केले होते. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी भाजपच्या नेत्यांनीही उपस्थित असायला हवे असे सांगितले होते. त्याशिवाय भाजपमधील स्थानिक नेत्यांवर आपले विशेष प्रेम असल्याचे जाहीर वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, “सर्व पक्षांनी मिळून विकासकामे करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. हे असेच चालले पाहिजे. हीच कार्यपद्धती असली पाहिजे. महानगरपालिका चालवण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. शेवटी सरकार बदल्यानंतर सरकारमधील लोकांचे काय मत आहे, हे अधिकारी बघतात. सरकार बदलून एक वर्ष झाले असून आमची विकासकामे सुरु आहे. सांगली महापालिकेला १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा आम्ही केली होती. त्यातील ९ कोटींच्या कामांचा शुभारंभ आम्ही केला होता.”

You might also like