‘मस्त चाललयं तुमचं, मग आमच्या लोकांना कशाला गळ घालताय ?’, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना सवाल

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर (On the statement of Deputy Chief Minister Ajit Pawar) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा खूप चांगले नेते आहेत, चांगले काम करतात. पण, त्यांच्यात ताकद असती तर 80 तासांचे सरकार त्यांना टिकविता का आले नाही, असा टोला लगावला आहे. तुमचे महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 17 ) सायंकाळी साईदरबारी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का? यांना निवडणूक आयोग, कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का, असा सवालही पाटील यांनी केला.

शिवसेना संपत चाललीय
आम्हीसुद्धा ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान होते. मात्र, शिवसेना सत्तेत असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र, शिवसेना संपत चाललीय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.