हे सरकार ठाकरे नव्हे तर राष्ट्रवादी चालवतंय : चंद्रकांत पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच राज्यातील आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील हे शिर्डी येथे आले होते. साईबाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. सीएएमुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. उलट पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या इस्लामिक देशातील छळवादाला कंटाळून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदू, जैन, शिख, बौद्ध आदींना नागरिकत्व मिळणार आहे. मात्र यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्ती चुकीचा अपप्रचार करून मुस्लिम समाजात भितीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुस्लिम आरक्षणावरून सरकारवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, देशातील मुस्लिमांना ओबीसी आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा लाभ पूर्वीपासूनच मिळत आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना 10 टक्के आरक्षण यापूर्वीच दिलं आहे. मग स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज काय आहे ? असा सवाल करताना मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा डाव असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.