पंकजा मुंडेंना चंद्रकांत पाटलांनी दिल्या शुभेच्छा ! भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. आता भाजपच्याच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शुभेच्छा देऊन त्यांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ दिले आहे. ते ‘गिफ्ट’ म्हणजे, पंकजा मुंडे यांना केंद्रातील संघटन पातळीवर जबाबदारी देण्यात येणार आहे. याबाबत त्यांना ही जबाबदारी मिळावी म्हणून केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाली आहे. त्यांना लवकरच जबाबदारी मिळेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस दोघेही केंद्रीय नेतृत्वाशी बोललो आहे. पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेही केंद्रीय नेतृत्वाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचा कॅमेरा व्यवस्थित सगळीकडे सुरू असतो.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे अजून 30 ते 40 वर्षे आहेत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व उजळत राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहे. आता गिफ्टचं म्हणाल, तर मी चॉकलेट आणले आहे. त्यांना ‘ई-चॉकलेट’ पाठवेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी मिश्किलपणे म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, पुण्यातील परिस्थितीवरही भाष्य केले. पुण्यात गंभीर परिस्थिती आहे. चार महिन्यानंतर का होईना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील करोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली पाहिजे. ही बैठक घेताना कद्रूपणा करू नये. विरोधी आमदारांनाही बैठकीला बोलवावे.

तसेच पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्याचे भाकीत केले जात आहे. आपण सर्व मिळवून हे भाकीत खोटं ठरवू. त्यात सरकारची मोठी भूमिका राहिल, असेही पाटील म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात यावे. मुंबईमध्ये जास्त काळ थांबू नये. अजित पवार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरही टीका केली. ही मुलाखत म्हणजे निव्वळ ‘मॅच फिक्सिंग’ आहे. खासदार संजय राऊत हे प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार. तुमचे केस वाढले… असले प्रश्न विचारणार. राऊत हे स्तुतीपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यायला हवी. चार महिन्यानंतर मुख्यमंत्री मीडियासमोर आले आणि तेही ‘सामना’समोर आले, असा चिमटाही पाटील यांनी काढला.

सध्या महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा शो सुरू आहे. उत्तम शो आहे, त्यांना हा शो करण्याचे स्वातंत्र्य आहे. अशोक चव्हाण यांनी आधी रागवायचे आणि माझं काही म्हणणंच नाही, असं दुसर्‍या दिवशी सांगायचं. ठिक आहे. तुमचं काही म्हणणं नाही, तर आमचंही काही म्हणणं नाही, असेही पाटील म्हणाले.

यंदाचा वाढदिवस उध्दव ठाकरे यांना चांगला आठवणीत राहिल
यात मुलाखत घेणारे (खासदार संजय राऊत), मुलाखत देणारे (मुख्यमंत्री उध्दव ठाकरे)आणि मुलाखत प्रसिध्द होणारे माध्यम (सामाना) हे सर्व शिवसेना पक्षाचेच आहेत. त्यामुळे या मुलाखतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून सोशल मीडियातूनही टीका केली जात आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चांगला आठवणीत राहिल, असे समजते.