सरकार अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार : चित्रा वाघ

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात महिला दिनाच्या दिवशी तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार दिवस होऊन गेले मात्र पोलिसांना अजूनही आरोपी सापडत नाही. त्यावरून सरकार अजून किती जणींचा बळी जाण्याची वाट पाहणार असा संतप्त सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

महिला दिनाच्या दिवशी अकोले तालुक्यातील खानापूर येथे एका तरुणीचा मृतदेह सापडला असून सात तारखेला शेळ्या चारण्यासाठी गेलेली देऊबाई गिर्हे (वय ३०) ही तरुणी संध्याकाळी घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी रात्रभर तिचा शोध घेतला. तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.मात्र चार दिवस दिवस उलटून गेले असून आरोपी अद्यापही मोकाट आहे. भाजपच्या जेष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या सोबत आदी घटनास्थळी आणि नंतर पीडितेच्या घरी जाऊन कटुंबियांचे सांत्वन केले.

अजून किती बळी ?

अकोलेतील झालेली घटना दुर्दैवी असून आरोपी नराधम अजूनही मोकाटच आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कधी पावलं उचलणार? अजून किती बळी गेल्यानंतर तुम्ही ठोस कारवाई करणार आहेत? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

सरकारने प्रत्येक जिल्हात महिला पोलीस स्टेशन उभे करण्याच्या भुमिकेचं स्वागत मात्र यामुळे महिलांची सुरक्षा होणार आहे का? जे पोलीस स्टेशन सध्या आहेत आहेत ते अद्ययावत केले जात नाही अनेक जिल्हात पोलीस संख्याबळ कमी आहे ते का भरले जात नाही. अहमदनर जिल्ह्यात तीन महिन्यांपासून पोलीस अधीक्षक पद रिक्त असून सरकार याकडे लक्ष देणार का? हे सरकारनं स्पष्ट करावं असं चित्रा वाघ पुढं म्हणाल्या.

अशा दुर्दैवी घटना घडत असून सरकारने पीडित कुटूंबाला मदत करण्याची मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीला कधी गजाआड होतील असा प्रश्न आहे.पोलीस काही संशियितांची चौकशी करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक रोशन पंडित यांनी व्यक्त केला.